खोपोली :( प्रतिनिधी) : खोपोली शहरात येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची तयारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक ३ मधून पत्रकार परमेश्वर भि. कट्टीमणी यांनी आम आदमी पार्टीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
परमेश्वर भि. कट्टीमणी हे News Journalist Association चे सक्रिय सदस्य असून, त्यांनी अनेक वर्षे पत्रकार म्हणून समाजातील विविध प्रश्न मांडून नागरिकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे. त्यांचा तळागाळातील संपर्क आणि समाजकारणातला सहभाग यामुळे नागरिकांमध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
आम आदमी पार्टीचे शहर संघटक डॉ. रियाज पठाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खोपोली शहराध्यक्ष जासुद्दीन खान यांच्या आशीर्वादाने परमेश्वर कट्टीमणी यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या तिकिटावरून उतरायचे ठरवले आहे. त्यांनी सांगितले की, “खोपोली शहराचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांना न्याय मिळवून देणे हेच माझे ध्येय आहे. आम आदमी पार्टीने दाखवलेले स्वच्छ राजकारण आणि विकासाचा आदर्श खोपोलीत आणायचा आहे.”
कट्टीमणी यांनी पुढे सांगितले की, शहरातील पायाभूत सुविधा, रस्त्यांची दुरवस्था, पाणीटंचाई, नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याच्या बाबतीत प्रशासनाने गंभीर पावले उचलावीत, असा जनतेचा आवाज ते निवडणुकीतून मांडतील.
डॉ. रियाज पठाण यांनीही सांगितले की, “परमेश्वर कट्टीमणी सारख्या प्रामाणिक आणि जनतेशी जोडलेल्या व्यक्तींचा राजकारणात प्रवेश हा आम आदमी पार्टीसाठी आणि खोपोलीसाठी सकारात्मक बदल घडवणारा ठरेल.”
खोपोली शहराध्यक्ष जासुद्दीन खान यांनीही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत शुभेच्छा दिल्या आहेत. नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन, वार्ड क्रमांक ३ मध्ये एक नवीन, स्वच्छ आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून कट्टीमणी यांच्याकडे पाहिले जात आहे.
आगामी काही दिवसांत आम आदमी पार्टीकडून त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.






Post a Comment
0 Comments