कर्जत-खालापूर / प्रतिनिधी: खालापूर तहसील कार्यालयापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर, जुन्या मुंबई–पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सीएनजी पंपाजवळ मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पावसाळ्यातही शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी दिवसभर पोकलॅन आणि जेसीबीच्या सहाय्याने डोंगर पोखरण्याचे दृश्य पाहायला मिळाले.
सूत्रांच्या माहितीनुसार, या उत्खननासाठी कोणतीही महसूल परवानगी अथवा रॉयल्टी भरलेली नसल्याने हे काम अवैध गोटांकडून सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन महसुलापासून वंचित राहत असून, परिसरात भूगर्भ खचण्याचा आणि भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
प्रशासन निश्चल?
खालापूर तालुका आणि रायगड जिल्ह्यात डोंगर पोखरण्याच्या घटनांमुळे आधीच अपघात व दुर्घटनांची मालिका सुरू आहे. तरीही प्रशासनाने कारवाईसंदर्भात मौन बाळगले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सुट्टीच्या दिवशी सुरू असलेल्या या उत्खननाकडे करजत प्रांताधिकारी, तहसीलदार, महसूल सहाय्यक व मंडळ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, गेल्या दोन-तीन वर्षांपासून खालापूर परिसरात उत्खननाचे प्रमाण वाढले असून, अनेक वेळा महसूल विभागाकडे तक्रार देऊनही भू-माफियांना संरक्षण मिळत असल्याचे आरोप होत आहेत.
तक्रार दिल्यावर धमक्या
गेल्या वर्षी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी अवैध उत्खननाबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार दिल्यानंतर, त्यांना भू-माफियांकडून "डंपरखाली चिरडून टाकू" अशा धमक्या मिळाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. मात्र आजपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
कडक कारवाईची मागणी
स्थानिक नागरिकांनी महसूल आणि पोलिस प्रशासनाला मागणी केली आहे की, अवैध उत्खननावर तातडीने संयुक्त पथक तयार करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच ज्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे भू-माफियांना संरक्षण मिळाले, त्यांच्याविरुद्धही चौकशी व्हावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “अवैध उत्खननाची माहिती दिली की उलट गुन्हे दाखल होतात, हे लोकशाहीत शोभणारे नाही. खालापूर तालुक्यात सध्या लोकशाही आहे की हुकूमशाही?” — असा प्रश्न लोकांमध्ये चर्चेला आला आहे.

Post a Comment
0 Comments