Type Here to Get Search Results !

* राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर*

  


           (प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाने अखेर नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.


      निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे — उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 10 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. अर्जांची छाननी 18 नोव्हेंबरला होईल, माघार घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर असून मतदान 2 डिसेंबरला पार पडणार आहे. मतमोजणी 3 डिसेंबरला होईल, तर निकाल 10 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात येईल.


        एकूण 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायती यांची निवडणूक होणार असून यात 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. यामध्ये 10 नवीन नगरपरिषदा आणि 15 नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे. एकूण 13,355 मतदान केंद्रांवर ई-वोटिंग प्रणालीचा वापर केला जाणार आहे. मतदारांना मोबाईल अॅपद्वारे मतदान केंद्र, उमेदवारांची माहिती तसेच उमेदवाराविषयीचा तपशील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


       निवडणुकीदरम्यान दुबार मतदारांवर कारवाईसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. दुबार नाव आढळल्यास त्या मतदाराची माहिती डबल स्टार करून त्यांना प्रतिसाद देण्यासाठी वेळ दिला जाईल. प्रतिसाद न दिल्यास त्यांचे नाव निष्क्रिय केले जाईल आणि मतदान केंद्रावर मतदानास प्रतिबंध केला जाईल.


        या घोषणेनंतर राज्यातील सर्वच पक्षांनी आपापली निवडणूक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुका या राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यात राजकीय चढाओढ आणि हालचालींना वेग येणार आहे, हे निश्चित आहे.

Post a Comment

0 Comments