खोपोली : (प्रतिनिधी) : लौजी–चिंचवली रस्त्यावरील जुना साकळ धोकादायक झाल्याने खोपोली नगर परिषदेने वाहतूक बंद केली. मात्र, महिनाभर उलटूनही पुनर्बांधणीचे काम सुरू न झाल्याने नागरिक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत. रेल्वे स्टेशनजवळील हा मुख्य मार्ग बंद असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. अपघात टळले असले तरी पर्यायी मार्गावरील कामे न झाल्याने जनतेचा राग वाढत चालला आहे.
स्थानिक नागरिक महेश यादव यांनी संताप व्यक्त करत सांगितले की, “महिन्याभरापासून काम सुरू झालेले नाही. प्रवास त्रासदायक झाला आहे आणि प्रशासन मात्र मुकदर्शक आहे. आमच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली जाते,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नगर परिषद घरपट्टी, पाणीपट्टी, कचरा पट्टी अशा विविध करांची वसुली मात्र वेळेवर करते. कर भरण्यास विलंब झाला तर अधिकचा आकार आकारला जातो. मग नागरिकांचा प्रश्न असा आहे की — नगर परिषदेने देखील आपली कामे वेळेत करावीत, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील.
साकळ बंद झाल्यामुळे प्रवास वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत. पूर्वी ६० रुपयांत होणारा प्रवास आता शंभर रुपयांत होत असून, स्टेशन परिसरातील वाहतूक कोलमडली आहे. रस्त्यावर गॅस लाईन, गटर, पाईपलाईन आणि नवीन गटरसाठी वारंवार खोदकाम झाल्याने रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.
या परिस्थितीवर आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी नगर परिषदेवर कामशून्यतेचा आरोप केला आहे. “अधिकारी आणि बांधकाम विभाग झोपले आहेत का? कामे त्वरित सुरू करा, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
खोपोली नगर परिषदेतील नियोजनाचा अभाव आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाचे अभियंते, ठेकेदार आणि अधिकारी यांच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. “एखादी दुर्घटना झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Post a Comment
0 Comments