शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी कुलदीपक शेंडे यांची उमेदवारी जाहीर
खोपोली : (परमेश्वर भि कट्टीमणी) : आगामी खोपोली नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) कडून नगराध्यक्ष पदासाठी कुलदीपक शेंडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली झालेल्या या निर्णयाने स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण केले आहे.
थोरवे यांच्या शांत पण नेमक्या रणनीतीमुळे शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून विरोधक मात्र बचावात्मक भूमिकेत गेले आहेत. थोरवे यांनी संघटनशक्ती दाखवत पक्षांतर्गत मतभेदांवर यशस्वीपणे नियंत्रण मिळवले आहे.
चारही गटांमध्ये उमेदवारीची हालचाल
कुलदीपक शेंडे यांच्या नावाच्या घोषणेनंतर खोपोलीच्या राजकारणात नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून कुलदीपक शेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून डॉ. सुनील गोटीराम पाटील, तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये अजूनही उमेदवार निश्चितीबाबत चर्चा सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे.
थोरवे यांची शांत रणनीती ठरली परिणामकारक
नगराध्यक्ष पदावर अनेक मोठी नावे चर्चेत असतानाही आमदार थोरवे यांनी संयमी आणि रणनीतिक भूमिका घेतली. त्यांच्या चालबाजीमुळे संघटनात एकसंधता राखण्यात यश आले असून “तलवारी म्यान, घरात दिवाळी!” अशीच स्थिती असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
‘मास्टरस्ट्रोक’ की राजकीय कोडी?
शिवसेना (शिंदे गट) – भाजप युतीच्या चर्चेला वेग आला आहे. जर ही युती जमली तर लढत त्रिकोणी न राहता थेट द्विपक्षीय होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हेही महाविकास आघाडीतील नेत्यांशी संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे खोपोलीतील निवडणुकीचा राजकीय थरार अधिक रंगतदार होणार यात शंका नाही.


Post a Comment
0 Comments