Type Here to Get Search Results !

*भयंकर अपघात : नवले पुल परिसरात कंटेनरचा ब्रेक फेल, ८ ठार – २५ जखमी*

  
  


         पुणे /  (विशेष प्रतिनिधी ) :पुण्यातील नवले पुल परिसरात आज संध्याकाळी झालेल्या भयंकर अपघाताने संपूर्ण शहर हादरले आहे. राजस्थान पासिंग असलेल्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने या वाहनाने अचानक नियंत्रण सुटून जवळपास २० ते २५ वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आतापर्यंत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


अपघात कसा घडला?


         मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याहून मुंबईकडे जाणारे कंटेनर नवले पुलाजवळील तीव्र उतारावरून वेगाने खाली येत असताना त्याचे ब्रेक निकामी झाले. नियंत्रण सुटल्याने कंटेनरने समोरच्या वाहनांना जोरदार धडक दिली. धडक झाल्यानंतर एक सीएनजी कार कंटेनरमध्ये अडकली आणि क्षणात तीला आग लागली. सीएनजी सिलिंडरचा स्फोट होऊन कारमधील प्रवासी जिवंत जळाले. अपघातानंतर परिसरात भीषण आग पसरली आणि अनेक वाहने जळून खाक झाली.


मृतदेहांची स्थिती व बचावकार्य


      घटनास्थळी तात्काळ पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा दाखल झाल्या. आतापर्यंत दोन महिलांसह एका मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून आणखी काही मृतदेह वाहनांमध्ये अडकले असावेत, अशी शक्यता आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे.


डीसीपी संभाजी कदम यांची माहिती


       डीसीपी संभाजी कदम यांनी सांगितले की, कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याचे प्राथमिक निरीक्षणात दिसून आले आहे. सध्या घटनास्थळी क्रेनच्या साहाय्याने मोठी वाहने हटवण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होईल.


नवले पूल – अपघातांचे हॉटस्पॉट


      नवले पूल परिसर हा वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे आधीच कुप्रसिद्ध आहे. येथे उतार, अरुंद रस्ते आणि महामार्गावरील मिसळणारे मार्ग यामुळे वाहनांचे नियंत्रण सुटण्याच्या घटना वारंवार घडतात. स्थानिकांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments