खोपोली : (परमेश्वर भि कट्टीमणी) – खोपोली नगर परिषदेच्या हद्दीतील सुभाषनगर परिसरातील नागरिक गेल्या आठ दिवसांपासून पाण्याच्या तुटवड्याने हैराण झाले आहेत. “दिवसभर नळ कोरडेच” अशा शब्दांत रहिवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी नियमितपणे कर आणि पाणी बिल भरलेले असूनही पाण्याचा पुरवठा होत नाही. “आम्ही सर्व देयकं वेळेवर भरतो, पण पाणी मात्र मिळत नाही — आमचं पाणी कुठे जातं?” असा संतप्त प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनावरील निष्क्रियतेवर टीका
रहिवाशांनी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे अनेकदा तक्रारी दिल्या असल्या तरी त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कर्मचाऱ्यांकडून केवळ “उद्या येईल, परवा येईल” अशी उत्तरे दिली जात आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. काही भागात बिल भरूनही पाणी येत नाही, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे.
दर महिन्याला पाणीपुरवठा विस्कळीत
सुभाषनगर परिसरात दर महिन्याला पाणीपुरवठा विस्कळीत होतो. कधी पंप खराब होतो, कधी वीज नसते, तर कधी वाल्व बंद राहतात. परिणामी नागरिकांना वारंवार पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या सततच्या गैरसोयीमुळे परिसरातील नागरिकांनी इशारा दिला आहे की, जर पुढील ४८ तासांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर ते नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करतील.


Post a Comment
0 Comments