Type Here to Get Search Results !

*विनय कदम प्रकरणात केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले यांचा हस्तक्षेप — तुषार तानाजी कांबळे यांच्या अखंड पुढाकारामुळे नॅशनल इन्शुरन्स कंपनीने दिला न्यायाचा शब्द*


     मुंबई : (विशेष प्रतिनिधी):विक्रोळी (पूर्व) येथील रहिवासी विनय साहेबराव कदम हे गेल्या सात वर्षांपासून सहानुभूतीच्या नियुक्तीच्या (Compassionate Appointment) प्रकरणात न्यायासाठी झगडत आहेत. त्यांच्या मोठ्या भावाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर नोकरीच्या मागणीसाठी त्यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे अर्ज केला होता. मात्र, अर्ज सादर करूनही कंपनीकडून अनेक वर्षे प्रतिसाद न मिळाल्यामुळे विनय कदम यांना प्रशासनाच्या उदासीनतेचा आणि अन्यायाचा सामना करावा लागला.


       या प्रकरणाची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि प्रभावशाली युवा तसेच बहुआयामी सामाजिक आणि राजकीय नेते तुषार तानाजी कांबळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर, त्यांनी स्वतः पुढाकार घेत न्याय मिळवून देण्याचे ठरवले आणि हे प्रकरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले साहेब यांच्याकडे नेले.



      प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन डॉ. आठवले साहेबांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड — भारत सरकारचा एक उपक्रम (Government of India Undertaking) — यांच्या मुंबई कार्यालयातील चीफ बिझनेस मॅनेजर श्री. उदयकुमार महानती यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि विनय कदम यांना योग्य तो न्याय देण्याचे निर्देश दिले.




       यानंतर तुषार तानाजी कांबळे यांनी स्वतः नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या मुंबई कार्यालयात चीफ बिझनेस मॅनेजर श्री. उदयकुमार महानती यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीत उदयकुमार महानती यांनी स्पष्ट केले की सदर प्रकरण हे त्यांच्या अधिकारात नसून कोलकात्यातील मुख्यालय (Head Office, New Town, Kolkata) यांच्या अखत्यारीत आहे.



        क्षणाचाही विलंब न करता तुषार कांबळे यांनी तत्काळ कोलकात्याचा प्रवास केला आणि केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले साहेबांचे अधिकृत पत्र घेऊन नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या मुख्यालयात (न्यू टाऊन, कोलकाता) भेट दिली.



      कोलकात्यातील या बैठकीदरम्यान तुषार तानाजी कांबळे यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे जनरल मॅनेजर श्री. अमित सतीश आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (E.D.) श्रीदेवी नायर यांना एकत्र भेट घेतली. त्यांनी मंत्री महोदयांचे पत्र सादर करून संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. तुषार कांबळे यांनी कंपनीकडून दिलेल्या जीआरच्या प्रतींतील विसंगती स्पष्ट करत विनय कदम यांना न्याय मिळवून देण्याची ठाम मागणी केली.

 

      जनरल मॅनेजर अमित सतीश आणि ई.डी. श्रीदेवी नायर यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती आणि न्याय्य कार्यवाहीपी करण्याPत येईल, असे आश्वासन दिले.



      कोलकात्यातील चर्चेनंतर तुषार तानाजी कांबळे यांनी पुन्हा मुंबईतील नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या चीफ बिझनेस मॅनेजर श्री. उदयकुमार महानती यांची भेट घेऊन बैठकीचा सविस्तर अहवाल दिला आणि विनय कदम यांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली.


       दरम्यान, या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की विनय कदम यांचे मोठे भाऊ स्व. सुधीर साहेबराव कदम हे नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड येथे डेप्युटी मॅनेजर पदावर कार्यरत होते. २ मे २०१८ रोजी झालेल्या रस्ते अपघातात त्यांचे निधन झाले. निधनानंतर त्यांच्या वडिलांनी ५ जुलै २०१८ रोजी कंपनीकडे विनंती केली की विनय कदम यांना सहानुभूतीच्या आधारावर नियुक्ती देण्यात यावी. कंपनीने अर्जासह आवश्यक कागदपत्रे मागवली आणि विनय कदम यांनी ११ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केला.




      मात्र, अर्ज दिल्यानंतर दीर्घकाळ कोणताही प्रतिसाद न आल्याने विनय कदम यांनी सतत पाठपुरावा केला. अनेक वर्षांनंतर, १५ जुलै २०२४ रोजी कंपनीकडून पत्र प्राप्त झाले ज्यात त्यांच्या अर्जास नकार देण्यात आला. कारण म्हणून नवीन शासकीय निर्णय (GR) दाखवण्यात आला, ज्यात वयोमर्यादा ३५ वर्षांपर्यंत निश्चित असल्याचे नमूद करण्यात आले होते. विनय कदम यांनी या जीआरची तारीख आणि अंमलबजावणीबाबत माहिती मागितली, परंतु कंपनीने कोणतेही उत्तर दिले नाही.


        यामुळे त्रस्त होऊन विनय कदम यांनी ३ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (NCSC) कडे तक्रार दाखल केली. आयोगाने २७ मार्च २०२५ रोजी कंपनीला स्पष्टीकरण मागविण्याचे निर्देश दिले. मात्र कंपनीने सादर केलेल्या उत्तरात आधी पाठवलेल्या जीआर प्रतीपेक्षा वेगळी तारीख व शीर्षक असल्याने विनय कदम यांनी संशय व्यक्त केला आणि ९ जून २०२५ रोजी प्रतिजवाब (Rejoinder) दाखल करून विसंगतींचा उल्लेख केला. आयोगाने पुन्हा कंपनीला १५ ऑगस्ट २०२५ रोजी ३० दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले. परंतु सर्वांच्या धक्क्यासाठी १ सप्टेंबर २०२५ रोजी आयोगाने कंपनीकडून उत्तर येण्यापूर्वीच प्रकरण बंद केल्याची माहिती दिली.


        विनय कदम यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला आणि कंपनीकडून सादर करण्यात आलेल्या जीआरच्या प्रामाणिकतेबाबत शंका उपस्थित केली. त्यांचे म्हणणे आहे की, जर हा जीआर खरोखर लागू असता, तर कंपनीने योग्य स्पष्टीकरण दिले असते आणि सातत्याने टाळाटाळ केली नसती.



     या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले यांचा संवेदनशील हस्तक्षेप आणि तुषार तानाजी कांबळे यांचा अखंड, ठाम आणि जबाबदार पुढाकार यामुळे प्रकरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. विनय कदम यांना न्याय मिळावा यासाठी पुढील सकारात्मक कार्यवाही सुरू असून, या प्रकरणाने पुन्हा एकदा तुषार तानाजी कांबळे यांच्या संघर्षशील नेतृत्वाची आणि समाजातील अन्यायाविरुद्धच्या त्यांच्या लढाऊ भूमिकेची प्रचिती दिली आहे.


     या संदर्भात बोलताना तुषार तानाजी कांबळे म्हणाले, “मी विनय कदम यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. न्याय मिळेपर्यंत ही लढाई मी चालू ठेवणार आहे.”

Post a Comment

0 Comments