खोपोली – (प्रतिनिधी) : शहरातील क्रांतीनगर भागात राहणारी स्नेहा अनिल कट्टीमणी (वय १९ वर्षे) हिचा मृतदेह विरेश्वर मंदिराशेजारील तलावातून हेल्प फाउंडेशनच्या टीमने शोधून काढल्याने खोपोली शहरात दु:खाची लाट पसरली आहे.
स्नेहा ही दोन दिवसांपूर्वीपासून बेपत्ता होती. घरच्यांनी तिचा शोध घेतला, पण ती मिळून आली नाही. अखेर कुटुंबीयांनी खोपोली पोलिस ठाण्यात मिसिंग कंप्लेंट दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, स्नेहा शेवटची विरेश्वर मंदिराच्या दिशेने जाताना दिसल्याचे समोर आले.
ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी हेल्प फाउंडेशनच्या टीमशी संपर्क साधला आणि तलाव परिसरात शोध घेण्याचे निर्देश दिले. सूचना मिळताच हेल्प फाउंडेशनचे सदस्य घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर तलावाच्या पाण्यात एका मुलीचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला.
प्राथमिक तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांनी सामाजिक माध्यमांतून स्नेहाच्या कुटुंबीयांप्रती शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
🕯️ जनजागृती संदेश :
तरुणांनी तणाव, नैराश्य किंवा अडचणीच्या काळात एकटे पडू नये. घरच्यांशी, मित्रांशी किंवा समुपदेशकाशी मनमोकळेपणाने बोलावे. प्रत्येक समस्येचे उत्तर असते, फक्त थोडा धीर आणि संवाद आवश्यक असतो. 💛

Post a Comment
0 Comments