खोपोली : (परमेश्वर भि कट्टीमणी) : खोपोली शहरातील मुस्लिम बेलदार समाजाने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात रुग्णांना फळवाटपाचा उपक्रम राबवून वेगळा आदर्श घालून दिला आहे.
अनेक वर्षांपासून विखुरलेला, अशिक्षित आणि रोजंदारी मजुरी करून उदरनिर्वाह करणारा मुस्लिम बेलदार समाज आता आपल्या न्याय आणि हक्कांसाठी एकवटू लागला आहे. या समाजाचे सुशिक्षित व अभ्यासू पत्रकार तय्यब खान यांनी समाजात ऐक्य निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
10 ऑक्टोबर रोजी आयोजित फळवाटप कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष कुलदीपकभाई शेंडे, खोपोलीचे पोलिस निरीक्षक सचिन हिरे, काँग्रेस महिला शहर अध्यक्षा रेखाताई जाधव, पत्रकार आकाश जाधव, प्रवीण कोल्हे, तसेच मुस्लिम बेलदार समाजाचे अध्यक्ष रऊफ खान आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी पत्रकार तय्यब खान यांनी समाजातील एकजुटीचे महत्व सांगताना, येणाऱ्या काळात समाजाला शासकीय योजना, मूलभूत सुविधा आणि न्याय हक्कांसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.




Post a Comment
0 Comments