खोपोली (विशेष प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापले असताना, पत्रकार जगतातील चर्चेचा विषय ठरला आहे. आता पत्रकार केवळ बातमीदार नसून बदलाचे वाहक म्हणून उदयास येत आहेत. लोकप्रतिनिधीपदाच्या प्रवासाला बळ देण्यासाठी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन (NJA) पुढे सरसावली आहे.
पत्रकार उमेदवारांना आमचा ठाम पाठींबा — राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्ये
NJA चे राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्ये यांनी सांगितले की, खोपोली नगर परिषद, कर्जत नगर परिषद, खालापूर आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये उतरलेल्या पत्रकार उमेदवारांना संघटनेचा ठाम पाठींबा राहील.
“पत्रकार हे समाजाचे मन, लोकांच्या भावना आणि वास्तव परिस्थिती जाणणारे असतात. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून खरे लोकप्रतिनिधी घडतील. पत्रकार निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर विकासाचा दृष्टिकोन बदलू शकतो,” असे सुर्ये यांनी म्हटले.
खोपोलीतून सुरुवात — N/J.A. चा पाठिंबा जाहीर
खोपोली नगर परिषद निवडणुकीत पत्रकार मानसी गणेश कांबळे (प्रभाग क्र. 1) आणि पत्रकार शिवाजी जाधव (प्रभाग क्र. 10) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांना NJA चा अधिकृत पाठींबा जाहीर करण्यात आला आहे.
सुर्ये म्हणाले, “पत्रकार समाजाचा आवाज आहेत. आता त्यांना विधानसभेपलीकडे, ग्रामपातळीवरील निर्णय प्रक्रियेत थेट सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे.”
पत्रकारांची दृष्टी विकासाभिमुख आणि समाजहितावर केंद्रित
पत्रकार समाजातील समस्या, विकासातील अडथळे आणि प्रशासनातील दुर्लक्ष यांना थेट स्पर्श करतात. त्यामुळे जर ते लोकप्रतिनिधी झाले, तर विकास अधिक पारदर्शक आणि जनतेच्या हिताचा होईल, असे NJA चे मत आहे.
पत्रकारांमधील निष्ठा, जनभावनेशी बांधिलकी आणि प्रशासनातील जबाबदारी या तिन्ही बाबी विकासाला नवी दिशा देऊ शकतात.

Post a Comment
0 Comments