खोपोली – (परमेश्वर भि कट्टीमणी) : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोपोलीत राजकीय वातावरण तापले आहे. सर्व पक्ष आपापल्या रणनीती आखत असतानाच आम आदमी पक्षानेही आपली तयारी पूर्ण केल्याचे संकेत दिले आहेत. प्रभाग क्रमांक 1 (सर्वसाधारण) या जागेवरून पक्षाचे खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची अधिकृत घोषणा आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण यांनी केली.
डॉ. पठाण यांनी सांगितले की, “खोपोलीतील नागरिकांना एक प्रामाणिक, स्वच्छ आणि सक्षम पर्याय देण्यासाठी आम आदमी पार्टी ही निवडणूक लढवत आहे.”
त्याचबरोबर ग्यासुद्दीन खान यांनी नागरिकांना आवाहन केले की, “कोणत्याही आमिषाला बळी न पडता, भ्रष्टाचारी नेत्यांना पुन्हा पुन्हा संधी देऊ नका.”
गेल्या काही वर्षांत स्थानिक पातळीवरील राजकारणात आम आदमी पक्षाने आपली उपस्थिती मजबूत केली आहे. शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमुळे आणि स्वच्छ प्रशासनाच्या भूमिकेमुळे पक्षाला युवक आणि नवमतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ग्यासुद्दीन खान यांच्या उमेदवारीमुळे खोपोलीतील राजकीय समीकरणांमध्ये नव्या हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे, पारंपरिक राजकीय पक्षांविरुद्ध असलेली नाराजी आणि बदलाची जनतेची भावना यामुळे या निवडणुकीत आम आदमी पक्षाला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.


Post a Comment
0 Comments