खालापूर : (परमेश्वर भि कट्टीमणी) : भारतीय जनता पार्टी खालापूर तालुक्याचे अध्यक्ष सनी यादव यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना महत्त्वाचे विधान केले आहे. पक्षाने संधी दिल्यास मी साजगाव जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार असून मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांवर ठोसपणे आवाज उठवणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सनी यादव हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विकासात्मक उपक्रमांत सक्रिय आहेत. गावोगावी फिरून त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत केले असून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा दिला आहे. याच कामगिरीच्या बळावर त्यांना स्थानिकांमध्ये मोठा पाठिंबा लाभला आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, “मी सदैव पक्ष संघटनेला प्राधान्य दिले आहे. प्रत्येक निवडणुकीत संघटन मजबूत करण्यासाठी मी झटत आलो आहे. आता पक्षाने साजगाव जिल्हा परिषदेची उमेदवारी दिल्यास मी विकासाच्या माध्यमातून तालुक्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करेन. शेतकरी, कामगार, गोरगरीब, महिला व युवक हे माझ्या कार्याच्या केंद्रस्थानी राहतील.”
यादव पुढे म्हणाले की, “माझ्या मते राजकारण हे केवळ पदांसाठी नसून समाजसेवेचे एक प्रभावी साधन आहे. खालापूर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हा माझा ध्यास आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, शेती विकास अशा सर्वच प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे.”

Post a Comment
0 Comments