Type Here to Get Search Results !

हत्ती–कबूतर–वराह यावर लक्ष; पण पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांकडे शासन, प्रशासन, नेतेमंडळी व मंत्र्यांचं दुर्लक्ष – तुषार तानाजी कांबळे यांची जाहीर भूमिका.

        




     खोपोली :( परमेश्वर कट्टिमणी ): “आज शासन, प्रशासनासोबत नेतेमंडळी व मंत्री हत्ती, कबूतर, वराह यांसारख्या विषयांवर चर्चा, बैठका आणि कार्यक्रम करताना दिसतात. प्राण्यांच्या संवर्धनावर लक्ष देणं चुकीचं नाही, पण याचवेळी आपल्या देशाच्या पोशिंद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होत असताना त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे, ही मोठी शोकांतिका आहे,” अशी तीव्र खंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड  चे महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांनी व्यक्त केली.


           ते पुढे म्हणाले,

     “अलीकडच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांची शेतपिके वाहून गेली, शेतं चिखलात गाडली गेली, तर जनावरं उपाशीपोटी जगण्याच्या संकटात आली आहेत. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्याला आता पावसाच्या प्रचंड तडाख्याने आणखी जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी शासन–प्रशासन, नेतेमंडळी व मंत्री जर मदतीकडे दुर्लक्ष करणार असतील आणि इतर गौण मुद्द्यांवरच भर देणार असतील, तर शेतकऱ्यांचा जीव धोक्यात येईल.”


       शेतकऱ्यांच्या समस्या मांडताना कांबळे म्हणाले,

      “आज शेतमालाला भाव नाही, विमा योजना फोल ठरत आहेत, शेतीसाठी लागणारी साधनं महाग झाली आहेत, तर कर्जमाफी अद्याप अपूर्ण आहे. शासनाने, प्रशासनाने आणि सत्तेतल्या मंत्र्यांनी जर तातडीने ठोस पावलं उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांच्या नाराजीचा ज्वालामुखी फुटेल. देशाचं पोट भरवणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळणं ही खरी राष्ट्रीय जबाबदारी आहे.”


     यावेळी मंत्री नितेश राणे यांना लक्ष्य करताना कांबळे म्हणाले,

    “शेतकरी रोज पावसामुळे उध्वस्त होत आहेत, हजारो कुटुंबांच्या घरी दिवा विझतो आहे; पण नितेश राणे मात्र शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी वेळ काढू शकत नाहीत. मात्र वराह जयंतीचं नियोजन करण्यासाठी आणि ती अधिक व्यापक करण्यासाठी त्यांच्याकडे विपुल वेळ आहे, ही खरी शोकांतिका आहे. जर एवढाच उत्साह शेतकऱ्यांच्या दु:खाकडे वळवला असता, तर आज अन्नदाता अंधारात रडत बसला नसता.”

Post a Comment

0 Comments