*अतिक्रमण विभाग करतात तरी काय नागरिकांचा प्रश्न ?*
*खोपोली ( शिवाजी जाधव )* - नगरपरिषद हद्दीत मुख्यबाजारपेठमध्ये भरणारा आठवडी बाजार म्हणजेच खोपोलीचा गुरुवार बाजार हा सर्वत्र प्रसिद्ध आहे. अनेक वर्षापासून सुरू असलेला बाजार यामध्ये कालांतराने मोठी वाढ झाली असून सदरील ठिकाणी अनेक परप्रांतीय व्यापारी यांनी अनेक मुख्य ठिकाणी कब्जा करत एक प्रकारे अतिक्रमण केले आहे. खालची खोपोली येथील असलेल्या अग्निशमन दल , मुस्लिम कब्रस्तान स्मशानभूमी , पेट्रोल पंप व हायको कॉर्नर याठिकाणी वाढलेल्या अतिक्रमणाबाबत खोपोलीतील अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.
खोपोली पोलिस ठाण्यात झालेल्या शांतता कमिटी मीटिंग मध्ये सदरील आठवडी बाजारा बाबत उपस्थित व्यापारी , राजकीय व कमिटीच्या सदस्यांनी गुरुवार बाजारामध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्याबाबत आवाज उचलला होता. याबाबत खोपोली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे , खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील व उपमुख्याधिकारी रंजीत पवार मागील आठवड्यात गुरुवार बाजारात ॲक्शन घेऊन सर्व कर्मचारी यांनी बाजारामध्ये उपस्थित राहून मुख्य ठिकाणी अतिक्रमण हटविण्याचे काम केले होते. त्यामुळे झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे खोपोलीतील सर्व थरातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी खोपोली पोलीस ठाणे , खोपोली नगरपालिकेचे भरभरून कौतुक केले होते तसेच सदरील कारवाई ही प्रत्येक गुरुवारी कायमस्वरूपी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. परंतु आजच्या गुरुवार बाजारातले चित्र वेगळे होते. खालची खोपोली येथील असलेल्या अग्निशमन दल , मुस्लिम कब्रस्तान स्मशानभूमी , पेट्रोल पंप इत्यादी परिसरात परप्रांतीय व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याचे पाहण्यास मिळाले. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापारी व स्थानिक नागरिक यांनी नाराजी व्यक्त केली असून ह्या परप्रांतीय व्यापाऱ्यांवर कोणाचा आशीर्वाद आहे. ज्यामुळे पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. अशा उलट सुलट चर्चा सध्या खोपोलीमध्ये सर्वत्र सुरू आहेत.

Post a Comment
0 Comments