Type Here to Get Search Results !

*खोपोलीत दीड दिवसाच्या गणेशोत्सवाचा उत्साहात व शांततेत विसर्जन सोहळा पार पडला.*

 




         खोपोली  : (प्रतिनिधी) खोपोली शहरात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची समाप्ती आज मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने झाली. कालपासून गणेशमूर्तींची स्थापना करून घराघरात व सार्वजनिक मंडपांमध्ये गणरायाची पूजा-अर्चा, आरत्या, भजन-कीर्तन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.




       आज सकाळपासूनच विसर्जनाची तयारी सुरू झाली होती. शहरातील प्रमुख मंडळांनी आकर्षक सजावट, रोषणाई व विविध सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांद्वारे गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरत्या, भजन आणि ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा जयघोषाने संपूर्ण खोपोली शहर दुमदुमून गेले.



        विसर्जन मिरवणुकीत तरुण, महिला व लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. ढोल-ताशा, झांज, लेझीम, पारंपरिक वाद्ये यांचा निनाद वातावरण भारून टाकत होता. शहरातील सर्व मंडळांनी शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुका काढून गणेशमूर्तींचे विसर्जन केले.



      नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने या सोहळ्यासाठी विशेष व्यवस्था केली होती. वाहतूक नियंत्रण, विसर्जन घाटांची स्वच्छता, सुरक्षा यावर विशेष लक्ष दिले गेले. स्वच्छता विभागाने विसर्जनानंतर तत्काळ घाट परिसर स्वच्छ करून नागरिकांचे समाधान मिळवले.


      शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू न देता संपूर्ण उत्सव शांततेत व सामंजस्याच्या वातावरणात पार पडल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गणरायाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तर होतेच, पण मनात पुढील वर्षी अधिक उत्साहाने बाप्पाचे स्वागत करण्याचा संकल्पही दिसून आला.


       खोपोलीतील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक ऐक्य, एकात्मता आणि भक्तिभावाचे प्रतीक आहे, हे यंदाच्या उत्सवातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.





Post a Comment

0 Comments