खोपोलीतून तहान संकटाला दिलासा
खोपोली : (प्रतिनिधी) :शहरातील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय खोपोली नगर परिषदेने जाहीर केला आहे. यानुसार आता खोपोलीकरांना दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना फक्त एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत होता.
आम आदमी पार्टीने या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. ३ सप्टेंबर रोजी नगर परिषदेसमोर साखळी उपोषणाला बसण्याची तयारी पक्षाकडून सुरू होती. मात्र आंदोलनाआधीच नगर परिषदेनं दोन वेळा पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने हे आम आदमी पार्टीच्या लढ्याचं मोठं यश मानलं जात आहे.
प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण यांनी सांगितले की, “खोपोलीकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी आम्ही सातत्याने लढा दिला. अखेर नगर परिषदेने जनतेचा आवाज ऐकून दोन वेळा पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला, हा आमचा विजय आहे.”
तर शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी स्पष्ट केले की, “आम आदमी पार्टी नेहमीच नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढत आली आहे. कर घेताना नागरिकांकडून वेळेवर वसुली केली जाते, मग सुविधा द्यायलाही उशीर होता कामा नये. अखेर आज खोपोलीकरांच्या हक्काचा विजय झाला आहे.”
नागरिकांनाही आता दोन वेळा पाणीपुरवठा मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आम आदमी पार्टीच्या पुढाकारामुळे खोपोलीच्या नागरिकांचा तहानलेला प्रश्न सुटला असून, हा निर्णय सर्वांच्याच समाधानाचा ठरला आहे.



Post a Comment
0 Comments