खोपोली नगर परिषदेचे सफाई कर्मचारी मरण यातना सहन करत आहेत. अतिशय दुर्बल समाजातून आलेल्या ह्या कर्मचाऱ्यांवर नगरपरिषद अन्याय करत असून त्यांना कोणतेही सुरक्षा किट जसे हात मौजे, बुट, मास्क, सुरक्षा गॉगल्स व गणवेश पुरवठा केला जात नाहीये त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.
खोपोली शहरात दररोज शेकडो टन कचरा प्रत्येक प्रभागातून निघत असतो सदर सफाई कर्मचारी दररोज सदर कचरा प्रत्येक घरातून जमा करून नगरपरिषदेच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये नेऊन टाकतात. परंतु नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारे काळजी घेत नाही त्यांच्या आरोग्याची तपासणी सुद्धा होत नाही व त्यांना सुरक्षा किट देण्यात आलेली नाही असे नागरिकांचे निदर्शनास आले आहे.
तसेच काही दिवसापूर्वी नगर परिषदेच्या घनकचरा गाडीवरील एका ड्रायव्हरचा डेंगू मुळे मृत्यू झाला अशी माहिती मिळाली आहे. सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार सुद्धा मिळत नाही अशी व्यथा काही कर्मचाऱ्यांनी मांडलेली आहे. हे सर्व पाहता सफाई कर्मचाऱ्यांचे कोणीही वाली शिल्लक राहिलेले नाही असे दिसत असून त्यांची व्यथा ऐकणारे नगर परिषदेमध्ये कोणीही अधिकारी आहे की नाही अशी शंका निर्माण होत आहे व खोपोलीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. पंकज पाटील हे सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण यांनी सांगितले.
नगर परिषदेने तातडीने कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढावा व सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षा किट देण्यात यावी असे आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments