Type Here to Get Search Results !

" खोपोली नगर परिषदेकडून नागरिकांच्या कराच्या पैशांचा चुराडा; D.C नगरमधील निकृष्ट रस्त्यामुळे संताप,"



चार महिन्यापूर्वी रेडिमेड काँक्रीट टाकून खड्डे बुजवण्यात आले होते.


फक्त बिल काढण्यासाठी रस्त्यांचे काम केले जात आहे : आप


खोपोली : प्रतिनिधी 

             खोपोली नगर परिषदेकडून शहरातील D.C नगर परिसरात करण्यात आलेल्या डांबरी रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय सुमार असून, हा रस्ता नागरिकांच्या कराच्या पैशांचा उघडउघड अपव्यय असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. गटारीचे काम आधी पूर्ण करणे आवश्यक असताना, कोणतीही पूर्वतयारी न करता थेट रस्त्याचे काम करण्यात आल्याने नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 



             दरवर्षी पावसाळ्यात D.C नगर परिसरातील गटारीचे संपूर्ण पाणी रस्त्यावर येत असून, संपूर्ण परिसर जलमय होत असतो. नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण होत असते. असे असतानाही गटारीची समस्या कायम ठेवून फक्त डांबरीकरण करून ‘कागदी विकास’ दाखवण्याचा प्रकार नगर परिषदेकडून करण्यात आल्याचा आरोप होत आहे.




           खोपोलीतील आम आदमी पार्टीचे नेते डॉ. रियाज पठाण यांनी या भागातील समस्या लक्षात घेऊन नगर प्रशासनाला वारंवार लेखी निवेदने व पुराव्यांसह सूचना दिल्या होत्या की, “प्रथम गटारीचे काम पूर्ण करा, त्यानंतरच रस्त्याचे डांबरीकरण करा, जेणेकरून नागरिकांची कायमची समस्या सुटेल.” मात्र प्रशासनाने या सूचनांकडे साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.




         स्थानिक नागरिकांच्या मते, लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेला हा रस्ता सहा महिने तर काय दोन महिन्यांपेक्षा जास्त टिकणार नाही. पावसाळा सुरू होताच रस्त्याची अवस्था पुन्हा बिकट होणार असून, याला जबाबदार कोण, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


          नगर परिषदेचा हा हलगर्जी आणि बेजबाबदार कारभार थांबवून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच आधी गटारीचे काम पूर्ण करून नंतर दर्जेदार रस्ता तयार करावा, अशी जोरदार मागणी D.C नगरमधील नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments