खोपोली : प्रतिनिधी
खोपोली नगरपरिषदेने केंद्रीय माहिती आयोगाच्या स्पष्ट आदेशांचा अभ्यास न करता तब्बल ६ आरटीआय अर्ज थेट फेटाळल्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यासंदर्भात डॉ. रियाज पठाण यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत सवाल उपस्थित केला आहे की, “नगरपरिषद माहिती का लपवत आहे? नेमके कोणते घोटाळे झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे?”
माहिती अधिकार कायद्यानुसार नागरिकांना माहिती मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. मात्र, केंद्रीय माहिती आयोगाचे आदेश डावलून आरटीआय अर्ज फेटाळणे म्हणजे कायद्याचा अवमान असल्याचा आरोप होत आहे.
डॉ. रियाज पठाण यांनी पुढे स्पष्ट केले की, या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे, अन्यथा नगरपरिषद प्रशासनातील संभाव्य गैरप्रकार जनतेसमोर येणार नाहीत. “पूर्ण चौकशीशिवाय हे प्रकरण शांत बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे खोपोली शहरात प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, आता यावर नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Post a Comment
0 Comments