Type Here to Get Search Results !

*डोंबिवलीत एकपात्री अभिनय स्पर्धा वर्ष ८ वे उत्साहात संपन्न; नवोदित कलाकरांचा उत्स्फूर्त सहभाग*

 


            डोंबिवली : (प्रतिनिधी) : डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन – सांस्कृतिक विभाग आणि दुर्वा एडुटेंमेंट प्रोडक्शन हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली एकपात्री अभिनय स्पर्धा – वर्ष ८ वी ही डोंबिवली पश्चिम येथील रेतीभवन बिल्डिंग, २रा मजला येथे शनिवारी मोठ्या दिमाखात पार पडली. दुपारपासूनच स्पर्धास्थळी कला साधकांची लगबग सुरु होती. शहरासह ठाणे जिल्ह्यातील विविध भागातील अनेक नवोदित तसेच अनुभवी कलाकारांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


       स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ नाटककार मार्गदर्शक आणि प्रसिध्द प्रशिक्षक अशोक हंडोरे सरांनी केले. त्यांनी प्रत्येक कलाकाराचा अभिनय, संवादफेक, भाव-भंगिमा, रंगमंचावरची उपस्थिती यांसारख्या महत्वाच्या बाबींवर बारकाईने लक्ष केंद्रित केले. हंडोरे सरांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला अधिक दर्जात्मक रूप लाभले.


        स्पर्धेदरम्यान सादर झालेल्या विविध एकपात्री प्रयोगांमध्ये सामाजिक विषय, कौटुंबिक नाट्य, विनोदी प्रस्तुती तसेच समाजजागृतीपर संदेश देणारी सशक्त सादरीकरणे विशेष आकर्षण ठरली. अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयातून परिक्षकांना मंत्रमुग्ध केले.


        स्पर्धेचा निकाल जाहीर करताना डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन आणि दुर्वा एडुटेंमेंट प्रोडक्शन हाऊस यांच्या वतीने विजेत्यांना रोख रक्कम तसेच प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच काही निवडक कलाकारांना प्रोत्साहन म्हणून उत्तेजनार्थ प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या सन्मानामुळे कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.


       स्पर्धेनंतर परीक्षक अशोक हंडोरे सरांनी सर्व कलाकारांना अभिनय कलेतील सूक्ष्म पैलू, संवादफेक सुधारणा, शरीरभाषेचे महत्त्व, तसेच रंगमंचावरचे आत्मविश्वास वाढविण्याच्या टिप्स, अशा अनेक बाबींचे मार्गदर्शन दिले. सरांचे प्रोत्साहनपर शब्द ऐकून अनेक कलाकार प्रेरित झाले.


       संस्थेचे संस्थापक व स्पर्धा आयोजक डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सपकाळ यांनी सर्व उपस्थित कलाकार, परीक्षक, तसेच प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की ही स्पर्धा नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच कलाक्षेत्राचा वारसा पुढे नेण्यास मदत करते.


      तसेच, विजेत्यांचे अभिनंदन करताना,  सर्व सहभागी कलाकारांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments