Type Here to Get Search Results !

*प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून सुवर्णाताई मोरे नामांकन भरत असून उत्साहाचे वातावरण*

 
.  


         खोपोली : (प्रतिनिधी) : आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून सौ. सुवर्णाताई संतोष मोरे यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या नामांकन दाखल कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

 



         सुवर्णाताई मोरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असून परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिला सबलीकरण तसेच युवकांसाठी मार्गदर्शन अशा विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांना प्रभागातील नागरिकांचा मोठा विश्वास असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले.




        नामांकन दाखल कार्यक्रम शनिवार, दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता खोपोली नगरपरिषद कार्यालयात पार पडणार आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, महिला आघाडी, युवक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.




        पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनात म्हटले आहे की, “प्रभाग क्रमांक 3 च्या सर्वांगीण विकासासाठी सुवर्णाताई मोरे हा एक सक्षम आणि विश्वसनीय पर्याय आहे. त्यामुळे सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून त्यांना आपला उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा.”


       खोपोलीत सध्या निवडणूक वातावरण तापू लागले असून विविध पक्षांचे उमेदवार प्रचारयोजना आखत आहेत. प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुवर्णाताई मोरे यांच्या नामांकनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अनेक नागरिकही प्रभागाच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत.

Post a Comment

0 Comments