प्रतिनिधी : तंत्रज्ञानामुळे जग ‘ग्लोबल विलेज’ झाले असले, तरी त्याच तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे सायबर क्राइमचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा गंभीर सामाजिक विषयावर भाष्य करणारे आणि प्रेक्षकांना जागरूक करणारे ‘इनोसंट’ हे उत्कंठावर्धक नाटक रविवारी (दि. ५ ऑक्टोबर २०२५) आचार्य अत्रे रंगमंदिरात रंगले.
या नाटकात सायबर गुन्ह्यांच्या घटनांची मालिका प्रभावीपणे मांडण्यात आली असून, प्रत्येक प्रसंगानंतर प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो – “पुढे काय होणार?”, “या मागचा सूत्रधार कोण?” आणि “या गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकलेले लोक सुटतील का?” अशा प्रश्नांनी प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहतात.
नाटकाचे लेखक-दिग्दर्शक अशोक हंडोरे यांनी कथा प्रभावीपणे रंगमंचावर साकारली असून सर्व कलाकारांनी त्यांच्या भूमिकांना न्याय दिला आहे. डॉ. डी. वाय. एस. सकपाळ फाउंडेशन आणि दुर्वा एडुटेंमेंट प्रोडक्शन हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने हे नाटक सादर करण्यात आले.
नाटकाचा मुख्य उद्देश केवळ मनोरंजन नव्हे, तर समाजात सायबर क्राइमविरोधात जागरूकता निर्माण करणे हा आहे. करमणुकीच्या माध्यमातून सावधगिरीचा संदेश देणारे हे नाटक प्रेक्षकांना विचार करायला लावते. विशेष म्हणजे, प्रयोगानंतर नाटकाची टीम सायबर क्राइमबाबत प्रेक्षकांना आवश्यक माहिती आणि मार्गदर्शनही देते.
सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा आणि सजग नागरिक म्हणून जबाबदारी कशी पाळावी, हे जाणून घेण्यासाठी ‘इनोसंट’ हे नाटक प्रत्येकाने सहकुटुंब अवश्य पाहावे, असा संदेश या प्रयोगातून दिला गेला.
लेखक-दिग्दर्शक: अशोक हंडोरे
निर्माता: डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ
निर्मिती संस्था: दुर्वा एडुटेंमेंट
प्रस्तुत : डॉ. डी. वाय. एस.फाउंडेशन

Post a Comment
0 Comments