खोपोली : (प्रतिनिध) : औद्योगिक आणि पर्यटनदृष्ट्या वेगाने वाढणाऱ्या खोपोली शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षाचालकांचा मनमानी कारभार सुरू असून नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक तसेच बाहेरील प्रवाशांना स्टेशनबाहेर उभ्या असलेल्या रिक्षा “सार्वजनिक सेवा” म्हणून नव्हे तर “खासगी नफ्याच्या दृष्टीने” चालवल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे.
स्थानिक प्रवाशांना नकार, लांबच्या फेऱ्यांना प्राधान्य
कडाव ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच शुभम मनोहर शिंदे यांनी सांगितले की, स्टेशनबाहेर रिक्षाचालक स्थानिक छोट्या अंतराच्या प्रवाशांना घेण्यास नकार देतात. “लोकल भाडे? नको... पुढच्या रिक्षेत जा!” असे म्हणत प्रवाशांना उर्मट प्रतिसाद दिला जातो. यामुळे महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना दररोज अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागतो.
‘वाहतूक नव्हे, त्रासाची व्यवस्था’ — शुभम शिंदे
शिंदे यांनी सांगितले की, रेल्वे स्टेशनबाहेर उभ्या रिक्षा स्थानिक प्रवाशांना सेवा देण्यास तयार नसतात. महिलांना उन्हात-पावसात चालत घरी जावे लागते, ही लाजिरवाणी बाब आहे. प्रशासनाने या रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रशासन, पोलीस आणि आरटीओ गप्प का?
खोपोली हे मुंबई-पुणे महामार्गालगतचे महत्त्वाचे पर्यटन केंद्र असून, येथे देशविदेशातून पर्यटक येतात. मात्र स्टेशनबाहेरील या मनमानीमुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे पोलीस, आरटीओ व स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी जबाबदारी घ्यावी रिक्षाचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक नगरसेवक, नगरपरिषद अधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. “फक्त फोटोंसाठी पुढे न येता, नागरिकांच्या मूलभूत प्रवास समस्यांकडे लक्ष द्या,” अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे.
खोपोलीकरांचा ठाम इशारा
“भाडे नाकारणा-या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करावी आणि महिलांसाठी स्वतंत्र रिक्षा स्टँड व्यवस्था करावी,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आरटीओ व पोलिसांनी दररोज तपास मोहीम राबवून रिक्षाचालकांना स्पष्ट सूचना द्याव्यात की, ही सार्वजनिक सेवा आहे, नफ्याचे साधन नाही.





Post a Comment
0 Comments