Type Here to Get Search Results !

*खोपोलीत मराठा समाजाचा जल्लोष; माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवस्मारकाला अभिवादन*


       खोपोली – (शिवाजी जाधव) : मराठा आरक्षणाचा दीर्घकालीन प्रश्न सुटावा या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने लढा दिला. त्यांच्या धडपडीमुळे अखेर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खोपोली शहरातही मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला.




     खोपोली शहरातील विविध भागातून मराठा बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले.  माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मिरवणुकीत "छत्रपती शिवाजी महाराज की जय", "मनोज जरांगे पाटील अमर रहे", "मराठा समाज एकजूट" अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले. शहरातील नागरिकांनी आपापल्या परीने या आनंदसोहळ्यात सहभाग घेतला.



       सुनील पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाजातील मान्यवर, पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. हा ऐतिहासिक क्षण अनुभवताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.


     कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. समाजातील महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून ऐक्याचे दर्शन घडवले.


     मराठा आरक्षणाचा लाभ मिळाल्याने समाजातील तरुणाईच्या शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधींना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. खोपोलीतील मराठा समाजाने हा दिवस ऐतिहासिक ठरला असल्याचे सांगत, यापुढेही समाजहिताच्या प्रत्येक लढ्यात एकत्र राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments