खोपोली : (परमेश्वर भि कट्टीमणी) : शिलफाटा परिसरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये आगामी नगरसेवक निवडणुकांची चर्चा रंगू लागली असून, या चर्चेत पत्रकार शिवाजी जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. केवळ शिलफाटा परिसरापुरतेच नव्हे, तर खोपोली शहरातील बाजारपेठा, रस्ते, गल्लीबोळ आणि चौकाचौकात त्यांच्या कामाची चर्चेची झंकार ऐकू येत आहे.
गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्या असतानाही जाधव यांनी नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता सातत्याने उपाययोजना केल्या. त्यांनी रस्त्यांची दुरुस्ती करून घेतली, गटारांवर औषधफवारणी, धूरफवारणी करून आजारांचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक शौचालयांमध्ये वीजपुरवठा सुरू करून दिला, प्रभागातील साफसफाई नियमित केली. काँक्रीट रस्त्यावर चिकटपणा झाल्यास त्वरित ब्लिचिंग पावडर टाकून नागरिकांना दिलासा दिला. एवढेच नव्हे तर परिसरातील दिवे बंद पडल्यास त्यांना त्वरित दुरुस्त करून लावण्याचे कामही त्यांनी हाती घेतले.
नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत वेळोवेळी आवश्यक उपाययोजना करणारे जाधव हे खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक ठरत आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रातून काम करत असूनही समाजकारणात सातत्याने योगदान देत ते नागरिकांच्या मनात वेगळी छाप पाडत आहेत.
आज प्रभाग क्रमांक 10 मध्येच नव्हे तर खोपोलीच्या विविध भागात जाधव यांच्या कार्यशैलीची चर्चा होत आहे. “प्रभागातील प्रश्न सोडवणारा नेता हवा तर तो म्हणजे शिवाजी जाधवच” असे नागरिक खुलेपणाने सांगत आहेत. त्यामुळे आगामी काळात जाधव यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार असून, प्रभागातील राजकीय समीकरणे त्यांच्या नावाभोवती फिरताना दिसत आहेत.



Post a Comment
0 Comments